मराठी पत्रकारितेचे जनक, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. राज्यभरातील पत्रकार आजच्या दिवशी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतात. आज ढाणकी शहर पत्रकार संघाच्या वतीने दिव्यांग अक्षय सुभाष हापसे ला मदत करून वेगळ्या पद्धतीने बाळशास्त्री जांभेकर यांना आदरांजली वाहण्यात आली. एखादे सामाजिक कार्य सुरू झाले की त्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी आपोआपच देणाऱ्याचे हात पुढे येत असतात. ढाणकी नगरपंचायत च्या निवडणुकीदरम्यान मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झालेले अरुण मोळक यांना दिव्यांग अक्षय बद्दल माहिती वृत्तपत्राद्वारे कळाली आणि त्यांनी कुठलाही विचार न करता अक्षय ला तीन चाकी सायकल भेट देण्याचे पत्रकार संघाला कळविले. त्याचप्रमाणे रयत फाउंडेशन हिमायतनगर यांनी सुद्धा अक्षय साठी पंचवीस हजार रुपयाचा निधी जमा केला. शहरातील दानशूर व्यक्तिमत्व असलेले धरमिचंद कोठारी यांचे सुपुत्र पराग कोठारी यांनी अक्षयला नवीन ड्रेस भेट दिला तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील यांनी सुद्धा रोख पाच हजार रुपयाची अक्षय ला मदत दिली. ही मदत अक्षय साठी खूप मोठी असून भविष्यात एखादा छोटासा व्यवसाय टाकून देण्याचा पत्रकार संघाचा मानस आहे. यावेळी अक्षयच्या वृद्ध आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. दिव्यांग अक्षय ची कहाणी शहर पत्रकार संघाने आपापल्या वृत्तपत्रात मांडली होती ही बातमी वाचून समाजातील दानशूर व्यक्तिमत्व पुढे आले आणि त्यांनी जमेल तशी अक्षयला मदत केली. सदर कार्यक्रमाचे आयोजन शहरातील बौद्ध विहारात करण्यात आले होते. शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सामाजिक ,कार्यकर्ते पोलीस अधिकारी, व पत्रकार बांधव व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार संघाच्या या सामाजिक उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे. सदर कार्यक्रम ढाणकी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी उपाध्यक्ष उदय पुंडे, सचिव नागेश महाजन , ब्रह्मानंद मुनेश्वर, गजानन गंजेवाड, विनोद गायकवाड, मोहन कळमकर, सुनील अक्कावार, कैलास घुगरे, राहुल चौरे, स्वप्नील चिकाटे , नंदकिशोर जाधव, सुभाष कस्तुरे, पंजाब भुतनर इत्यादी पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश महाजन यांनी केले.


0 टिप्पण्या