शेवटच्या दिवशी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची एकच धावपळ . शहरात नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत पाहावयास मिळणार.


नगरपंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची सोमवारी शेवटची तारीख होती. त्यामुळे उमेदवारांची चांगली तारांबळ उडाली. दुपारी तीन वाजेपर्यंत नमांकन अर्ज स्वीकारले जाणार होते. त्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये नामांकन अर्ज स्वीकारल्या जाणार नाही असे निवडणूक निर्णय अधिकारी राजू सुरडकर यांनी सांगितले. त्यामुळे शेवटच्या दिवशी आपला अर्ज भरण्यात यावा याकरिता उमेदवार घाई करताना दिसून येत होते. अर्ज भरण्यासाठी आपल्या समर्थकांसमवेत वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे उमेदवार शक्ती प्रदर्शन करत नगरपंचायत कडे अर्ज भरण्यासाठी आले होते.  शेवटच्या दिवशी पक्षांनी आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला. 

भाजपचे नेते दत्त दिगंबर वानखेडे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने ही निवडणूक भाजपाला जड जाणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. शिवसेना शिंदे गटाने 17 ही प्रभागांमध्ये तसेच अध्यक्षपदासाठी आपले उमेदवार उभे केल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे भाजप आणि काँग्रेस सुद्धा उमेदवार निवडताना खबरदारी घेताना दिसून येत आहेत. बऱ्याच प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने एबी फॉर्म कुणाला जोडायचा हा प्रश्न राजकीय पक्षांना पडला आहे. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांनी बंडाळी करू नये यासाठी राजकीय पक्षांना  तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या ढाणकी शहरांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत दिसून येत असून भाजपाकडून शिवनंदा रमेश गायकवाड , काँग्रेसकडून रेखा रमेश गायकवाड, शिवसेना (उ .बा. ठा) कडून अर्चना सुंदरकांता वासमवार, तर शिवसेना  शिंदे गटाकडून आरती राजू कलाले  यांची लढत पाहावयास मिळणार आहे. यांना पक्षांची अधिकृत उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे . नगराध्यक्ष पदासाठी कोण बाजी मारेल हे येणारी वेळच सांगेल तूर्तास तरी शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे नगराध्यक्ष पदासाठी काटे की टक्कर होणार आहे. तसेच सिमा तानाजी गायकवाड रिपब्लिकन सेना, संघमित्रा संतोष गायकवाड वंचित बहुजन आघाडी व सूर्यंका प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे आजाद समाज पार्टी यांची सुद्धा उमेदवारी गेम चेंजर ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या