उमेदवारांना नामनिर्देशन पत्र भरण्याची तारीख ही 17 नोव्हेंबर आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ येत असल्याने उमेदवारांची उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू झालेली आहे. शासनाने आज सुट्टीच्या दिवशीही अर्ज भरण्याची मुभा दिली असल्याने ढाणकी नगरपंचायत येथे अध्यक्ष व नगरसेवक पदासाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी एकच घाई केली. नगराध्यक्ष पदासाठी रविवारी ऑनलाईन सहा अर्ज तर नगरसेवक पदासाठी एकूण 35 अर्ज दाखल झाले.
ढाणकी नगरपंचायतच्या निवडणूकी साठी राजकीय पक्ष सज्ज झाल्याचे दिसून येत आहेत तसेच आपल्यालाच पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक उमेदवार सुद्धा पक्षश्रेष्ठीकडे साकडे घालत आहेत. यावेळी राजकीय पक्ष उमेदवार निवडताना सर्व प्रकारची काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे. सर्वच राजकीय पक्षानी इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या. परंतु अद्याप कोणत्याही पक्षाने नगराध्यक्ष व तसेच नगरसेवक पदाचे आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे शहरात एक प्रकारचा सस्पेन्स निर्माण झालेला आहे. सर्वच इच्छुक उमेदवार मलाच पक्षाची टिकीट मिळेल या अभिर्भावात वावरत असून एनवेळी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल हे निश्चित सांगता येत नाही. शेवटच्या क्षणापर्यंतही अधिकृतपणे उमेदवार ची यादी जाहीर न झाल्याने उमेदवाराची स्थिती सुद्धा तळ्यात मळ्यात होत आहे. शहराची नगरपंचायत झाल्यानंतर ही दुसरी निवडणूक आहे. शहरात सर्वात मोठा पाण्याचा प्रश्न असून शहरातील पाणीटंचाई मिटवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. या निवडणुकीत पाणी प्रश्न नक्कीच पेटेल यात दुमत नाही. तसेच शहराची पाणी समस्या मिटवणारा उमेदवार नागरिकांना हवा आहे. ही बाब सुद्धा राजकीय पक्ष लक्षात घेतीलच. एकंदरीत उमेदवारांबरोबर नागरिक सुद्धा राजकीय पक्ष आपले उमेदवार कधी जाहीर करतील याकडे लक्ष देऊन बसलेले आहेत.

0 टिप्पण्या