उमरखेड तसेच महागाव तालुक्यात धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांमध्ये प्रचंड आवाजात डी.जे.चा वापर होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून कायदा व सुव्यवस्थेच्या समस्याही निर्माण होत असल्याचे लक्षात घेता उपविभागीय दंडाधिकारी एस. पी. मुळे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163(1) अन्वये डी.जे. वापरावर तात्काळ बंदी घालण्याचा आदेश (दि. ३० सप्टेंबर २०२५) जारी केला आहे. डी.जे.च्या अतिप्रचंड व कर्कश आवाजामुळे हृदयविकाराचे झटके, उच्च रक्तदाब, श्रवणदोष, चिडचिडेपणा यांसारखे गंभीर आजार होण्याचा धोका असल्याचे सर्वेक्षणांमध्ये नमूद असून वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले यांना नाहक त्रास होत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय डी.जे.मुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याचे प्रकार व गुन्हे दाखल झाल्याची नोंद पोलिसांकडे असल्याचेही अधोरेखित केले आहे. नगरपरिषदे कडून मिरवणूक मार्गावरील जुन्या घरांच्या मोडकळीसंबंधी दिलेल्या अहवालात डी.जे.च्या कंपामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सव, दुर्गोत्सव, ईद-ए-मिलाद, धम्मचक्र प्रवर्तन दिन, लग्न समारंभ, जयंती उत्सव आदी कोणत्याही कार्यक्रमात डी.जे. वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. इतर पारंपरिक वाद्य मात्र वापरता येतील. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर भारतीय नागरीक न्याय संहिता 2023 च्या कलम 223 नुसार शिक्षेची कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.उपविभागीय दंडाधिकारींचा आदेश जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाण्यांना कार्यवाहीसाठी कळविण्यात आला आहे.

0 टिप्पण्या