मानवीय सेवेत अग्रणी – जिव्हाळा संस्थेकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात. गुंज संस्थेच्या सहकार्याने शेकडो कुटुंबांना नवी आशा. नैसर्गिक आपत्ती काळात संस्थेचे अविरत कार्य सुरु.


इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार व ISO मानांकन प्राप्त जिव्हाळा संस्था, उमरखेड यांच्या पुढाकाराने व गुंज संस्था, दिल्ली च्या सहकार्याने उमरखेड तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांसाठी मदतकार्याची सुरुवात झाली आहे. १५ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी आणि इसापूर धरणातील पाण्याचा विसर्ग यामुळे पैनगंगा नदी परिसरात भीषण पूरस्थिती निर्माण झाली. या आपत्तीमध्ये शेकडो कुटुंबांचे घरे, शेती, जनावरे व जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान होऊन अनेक कुटुंबे बेघर व संकटात सापडली. या कठीण प्रसंगी जिव्हाळा संस्था आपत्तीग्रस्त नागरिकांच्या सोबत खंबीरपणे उभी राहिली आहे. गुंज संस्था, दिल्ली चे प्रतिनिधी अजित कांकरिया यांच्या हस्ते उमरखेड, विडूळ, पळशी, आडद, गंगनमाळ, धनज या गावांमध्ये मदत वितरणाचा शुभारंभ झाला. या उपक्रमाअंतर्गत ५०० हून अधिक कुटुंबांना फॅमिली किट वाटप करण्यात आले. या किटमध्ये कपडे, बूट-चप्पल, सतरंजी, भांडी, ताडपत्री तसेच गृहउपयोगी साहित्याचा समावेश होता. या मदतीमुळे शेकडो कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळून त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले. जिव्हाळा संस्थेचे अध्यक्ष अतुल लताताई राम मादावार म्हणाले “उमरखेड उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे व तहसीलदार राजेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिव्हाळा संस्था नैसर्गिक आपत्तीमध्ये अविरत मदतकार्य करीत आहे. गुंज संस्था, दिल्ली  यांच्या अमूल्य सहकार्यामुळेच ही मदत शक्य झाली. संस्थेच्या स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमांमुळेच हा उपक्रम यशस्वी ठरला.” या अभियानात संस्थेचे स्वयंसेवक श्रीकांत शहा, दुर्गाजी जंगले, दीपक जंगले, सखाराम गायकवाड, गजानन कबले, राजू सुनेवाड, विजय राठोड, दिनेश चव्हाण आदींनी मोलाचे योगदान दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या