ढाणकी शहरात दोन दिवसापूर्वी घडलेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तालुका दर्जाचे शहर असताना महिला सुरक्षितेसाठी संबंधित प्रशासन मागे पडताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसापासून शहरातील नागरिकांनी दामिनी पथकाची मागणी प्रशासनाकडे केली मात्र त्या मागणीला प्रशासन गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे पुन्हा एखाद्या निर्भयाचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील वाढती रोडरोमिओ ची संख्या, आणि व्यसनाधीनता यामुळे एखादी अघटीत घटना घडू शकते. याकडे सुद्धा पोलीस प्रशासनाने गांभीर्याने पाहावे लागेल . शहरातील सहारा पार्क येथे अल्पवयीन मुलांचे टोळके तिथे बसून असतात ते तेथे नशा पाणी तर करत नाहीत ना? याकडे पण पोलिस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. शहरात परिसरातील सर्वात मोठी मुलींची शाळा असून शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेस रोड रोमिओ शाळेच्या परिसरात फिरत असतात त्यावर सुद्धा अंकुश लावावा लागेल. त्यासाठी महिला पोलीस कर्मचारी किंवा दामिनी पथकाची नेमणूक आवश्यक आहे. शाळा परिसरामध्ये सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे बाहेरच्या दिशेने लावणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे परिसरातील घटनेवर पोलीस प्रशासनाला लक्ष ठेवता येईल. दोन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेतून बोध घेऊन पोलीस प्रशासनाने निर्भया पथकाची निर्मिती करावी अशी मागणी शहरातील नागरिकांची आहे.
शहरासाठी दामिनी पथकाच्या मागणी साठी प्रहार पक्षातर्फे लवकरच उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देणार असल्याची माहिती प्रहारचे तालुकाप्रमुख सय्यद माजिद यांनी दिली.

0 टिप्पण्या