ढाणकी
"जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेवत्या राहो रुधिरातून संवेदना."
ह्या एका चित्रपटातील गाण्यातील ओवी माणसाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडतात. दुर्बलांचे दुःख आणि वेदना जाणवण्यासाठी तश्या माणसांमध्ये संवेदनाही असाव्या लागतात तेव्हाच त्यांची दुःख ही माणसाला कळते. या चित्रपटातील ओवीप्रमाणेच आज सुद्धा समाजात अशी काही व्यक्ती आहेत की ज्यांना गरिबांच्या दुःखाची जाणीव असून त्यावर ती थोड्या प्रमाणात का होईना फुंकर घालण्याचा प्रयत्न करतात. ढाणकी शहरातील शौर्य बद्दलची कहाणी वृत्तपत्रांमध्ये काल प्रसिद्ध झाली आणि शौर्य ला आपणही काही मदत करून खारीचा वाटा उचलावा या उद्देशाने ढाणकी काँग्रेस शहर अध्यक्ष अमोल तुपेकर आणि वि.का.स सोसायटीचे संचालक राहुल बाळासाहेब चंद्रे यांनी आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा न करता शौर्य आणि त्याच्या आजीला मदत करून आपल्या आनंदात त्यांना सामावून घेतले.
अमोल तुपेकर हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये आपले योगदान देत असतात तर राहुल पाटील चंद्रे यांना तर समाजसेवेचा वारसाच लाभलेला आहे. त्यांचे वडील बाळासाहेब चंद्रे पाटील हे सुद्धा आर्थिक दुर्बल घटकांना जमेल तशी मदत करत असतात. आज शौर्य बद्दल त्यांना माहिती कळताच अमोल तुपेकर यांनी शौर्य याला ड्रेस व त्याच्या आजीला साडी दिली तर राहुल पाटील चंद्रे यांनी किराणा भरून देत त्यांचा आनंद द्विगुणीत केला. या कार्यामध्ये आपलेही काही योगदान असावे म्हणून शहरातील गोदावरी मल्टीस्टेट बँकेने सुद्धा शौर्य याला स्कूल बॅग गिफ्ट दिली.
अमोल तुपेकर, राहुल चंद्रे यांनी जो वाढदिवसाचा खर्च टाळून गरिबांना मदत करण्याचा पायंडा घातला तो इतरांनीही अनुसरायला हवा जेणेकरून आपला आनंद द्विगुणीत करता येईल आणि समाजातील दुर्बल घटकाला थोडी बहुत मदत मिळेल.

0 टिप्पण्या