माहितीचा अधिकार का टाकला म्हणून दोघांवर तलवारीने हल्ला. निंगनूर येथील घटना.


ढाणकी प्रतिनिधी -ग्रामपंचायतीच्या कारभाराचा लेखाजोखा घेण्यासाठी  माहिती अधिकार टाकलेल्या दोघांवर गावातीलच उपसरपंचाचे पती व त्यांच्या मुलांनी तलवारीने हल्ला करून त्यांना जखमी केले.

सविस्तर वृत्त असे की, निंगनुर गावातील  फारुख खान शाहबाज खान पठाण वय 37 वर्ष व त्यांचा भाचा मुतालिक खान अश्रफ खान हे जी प शाळेजवळ उभे असताना  त्यांच्याशी वाद घालण्याच्या हेतूने व माहिती अधिकार  टाकल्याचा  रोष मनात ठेवून निंगनूर येथील उपसरपंच चे पती वली उल्ला खान अब्दुल खान, इमरान खान वलीउल्ला खान, सद्दाम खान वलीउल्ला खान, इबाद खान वलीउल्ला खान, साजिद खान वलीउल्ला खान, व राजिकखान कलीम खान  यांनी त्या दोघांसोबत  वाद घातला व अश्लील भाषेत शिवीगाळ करून तुम्ही ग्रामपंचायत वर  माहिती अधिकार का टाकला असे विचारले. यात वाद होऊन तो विकोपाला गेला.  चिडलेल्या  वली उल्ला खान यांनी आपला लहान मुलगा साजिद खान यास गाडीतील तलवार आणून फारुख पठाण व त्यांचा भाचा मुतालिक खान यास  जीवे मारण्याची धमकी दिली. या झालेल्या झटापटीत फारुख पठाण व मुतालिका खान दोघेही जखमी झाले. त्यानंतर दोघांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी येथे आणून उपचार करण्यात आले. वरील सहा आरोपींविरुद्ध बिटरगाव पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड विधान  कलम 307, 143, 144, 147,  148,149, 294 , 109, शस्त्र अधिनियम कलम 4/25 नुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहे. सहापैकी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्ह्यातील 3 आरोपी फरार आहेत. पुढील तपास बिटरगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रताप भोस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या