बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाणकी पोलीस चौकी येथे आज पोलीस दलाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. पोलीस स्टेशनला प्राप्त झालेल्या तीन नवीन अत्याधुनिक वाहनांचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला उमरखेड-महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे आणि भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते या वाहनांचे पूजन करून ती पोलीस दलाच्या सेवेत समर्पित करण्यात आली. बिटरगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्राचा विस्तार आणि सुरक्षेची गरज लक्षात घेता, या नवीन अत्याधुनिक वाहनांमुळे पोलिसांची गस्त अधिक वेगवान आणि प्रभावी होणार आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने पोहोचण्यासाठी या वाहनांची मोठी मदत होणार असल्याने, पोलीस स्टेशनची शक्ती आता खऱ्या अर्थाने वाढली आहे. या लोकार्पण सोहळ्याला शहरातील प्रतिष्ठित नगरसेवक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन वाहनांच्या आगमनामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक चोख राहील, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे, उपनिरीक्षक सागर अन्नमवार, व सर्व पोलीस कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

0 टिप्पण्या