प्रशासकीय अनास्थेचा बळी. पैनगंगेच्या पुलावरून दुचाकी कोसळून आजी ठार, नातू गंभीर, विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर खळबळ


ढाणकी प्रतिनिधी - ज्या पुलाने दोन प्रदेशांना जोडले, त्याच पुलाने एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतला आहे. उमरखेड तालुक्यातील खरबी येथील पैनगंगा नदीच्या पुलावर कठडे नसल्यामुळे शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. दुचाकी थेट नदीपात्रात कोसळल्याने वृद्ध आजीचा जागीच मृत्यू झाला, तर नातू मृत्यूशी झुंज देत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या झोपे मुळे आणखी किती निष्पापांचे बळी जाणार? असा संतापजनक सवाल आता नागरिक विचारत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धुपताबाई वामन साखरे आणि त्यांचा नातू सतीश इंगळे हे शनिवारी (दि. 11 एप्रिल) रात्री 9.30 च्या सुमारास कोर्टा (ता. उमरखेड) येथून किनवटकडे दुचाकीने जात होते. रात्रीचा अंधार असल्याने आणि पुलाला संरक्षक कठडे नसल्याने सतीशला रस्त्याचा अंदाज आला नाही. क्षणात दुचाकी पुलावरून खाली थेट पैनगंगा नदीच्या पात्रात कोसळली. या भीषण अपघातात धुपताबाईंचा जागीच अंत झाला, तर सतीश गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच दराटी आणि किनवट पोलीस ठाण्याच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. किनवटचे पीएसआय सागर झाडे, गजानन डुकरे आणि दराटीचे एस. एन. रणवते, रवींद्र जाधव, अमोल गंगर पाड यांनी रात्रीच्या अंधारात संयुक्त बचाव मोहीम राबवली. जखमी सतीशला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून नदीपात्रातून दुचाकी बाहेर काढण्यात आली आहे. खरबी पुलाची अवस्था गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत दयनीय आहे. पावसाळ्यात पुलावरील कठडे वाहून गेले होते, पण त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ते पुन्हा बसवण्याची तसदी घेतली नाही. आणि त्यामुळे धूरपता बाईचा बळी गेला. अजून किती बळी गेल्यावर सदर पुलाचे दुरुस्ती चे काम होईल असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या