ढाणकी प्रतिनिधी- कर्तव्यदक्षता, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या पोलीस दलातील एका अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा यथोचित गौरव आज झाला आहे. बिटरगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले गजानन कनाके यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी पदोन्नती झाली आहे. विशेष म्हणजे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनीच त्यांना हा सन्मान मिळाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. कनाके साहेबांनी वयाची 55 वर्षे ओलांडली असली, तरी त्यांचा कामातील तत्परता आणि शारीरिक फिटनेस पाहून आजही एखादा तरुण लाजेल अशी त्यांची ऊर्जा आहे. पोलीस दलात अनेक वर्षे इमानाने सेवा बजावल्यानंतर, त्यांच्या खांद्यावर लागलेले हे 'स्टार्स' त्यांच्या प्रामाणिकपणाची आणि निष्ठेची पोचपावती मानली जात आहे. पोलीस खाते म्हटले की तणाव, धावपळ आणि 24 तास ड्युटी हे समीकरण आलेच. मात्र, अशा कठीण क्षेत्रात राहूनही कनाके साहेबांनी आपल्या मनातील संगीताची ओढ जिवंत ठेवली आहे. केवळ एक पोलीस अधिकारी म्हणून नव्हे, तर एक सुहृद संगीतप्रेमी म्हणूनही त्यांची ओळख परिसरात आहे. त्यांचे दिलदार आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व पोलीस दलाची प्रतिमा उजळवणारे ठरले आहे. कनाके साहेबांच्या या यशाबद्दल बिटरगाव पोलीस स्टेशनसह जिल्हा पोलीस दलात त्यांचे कौतुक होत आहे. वयाच्या उत्तरार्धातही जिद्दीच्या जोरावर उच्च पद गाठणाऱ्या कनाके साहेबांचा प्रवास नवीन भरती झालेल्या तरुण पोलिसांसाठी एक मोठा आदर्श आहे. पुढील कार्यकाळात त्यांच्या हातून अशीच देशसेवा घडावी आणि त्यांचे आरोग्य उत्तम रहावे, अशा शुभेच्छा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या आहेत.

0 टिप्पण्या