ढाणकी येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी.


ढाणकी- महात्मा बसवेश्वर हे न्यायप्रिय  राजा होते.त्यांना बसव, बसवन्ना  इत्यादी नावाने सुद्धा ओळखले जाते व तसेच थोर समाज सुधारक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी एकेश्वरवादाचा पुरस्कार केला. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यामधील इंगळेश्वर बागेवाडी या गावात ११०५ साली वीरशैव कुटुंबात झाला. मुख्यत्वे करून त्यांचा जन्म अक्षय तृतीयेला झाला होता. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या  या मुहूर्तावर बसवन्नांचा जन्म झाल्याने या दिवसाला लिंगायत समाजात महत्त्वाचे स्थान आहे. अश्या या समाजप्रिय, न्यायप्रिय राजा महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज ढाणकी येथे लिंगायत समाज बांधवांच्या वतीने  उत्साहात साजरी करण्यात आली.

स्थानिक बसवेश्वर मठ येथे  समाज बांधवांच्या वतीने  बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती उत्सवाला सुरुवात झाली. समाज बांधवांच्या वतीने गावात  ढोल ताशांच्या गजरात  प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी महिलांनी  शोभा यात्रेच्या स्वागतासाठी जागोजागी  रांगोळ्या काढल्या होत्या. शोभयात्रेत महिला व पुरुषांनी खेळलेल्या फुगड्या ह्या शोभयात्रेचे आकर्षण ठरत होते, तसेच समाज बांधवांनी शोभा यात्रेत  सहभागी होणाऱ्यांसाठी  जागोजागी  नींबू शरबत वाटले. शहराच्या मुख्य बाजारपेठेतून ही शोभायात्रा जाऊन  छत्रपती  शिवाजी महाराज  चौकापर्यंत  गेली. यावेळी समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन केले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सुद्धा पुष्पहार घालून मानवंदना देऊन महात्मा बसवेश्वर यांना अभिप्रेत असलेल्या सर्व धर्म समभावाची प्रचिती दिली. या जयंती उत्सवात ढाणकी शहरातील सर्व  लिंगायत समाज बांधव, महिला, युवा उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या