विश्ववंद्य, ज्ञानाचा महामेरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. शहरो शहरी आणि खेडो पाडी, डीजेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीताने सर्व आसमंत दुमदुमून निघतो. आणि खरंच हा सोहळा पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहतो. ज्या समाजामध्ये माणूस माणसाच्या स्पर्शाने सुद्धा बाटला जात होता , ज्या समाजात माणसाची सावली सुद्धा विटाळ समजली जात होती , त्याच्यासोबत बोलणे तर दूरच पण त्याच्याकडे पाहिले तरी पाप होते असे समजले जात होते अशा या समाजात बाबासाहेबांनी अभूतपूर्व असे कार्य करून समाजातली विषमतेची दरी पूर्णपणे मिटवून टाकली आणि घटना लिहून सर्व माणसांना एका समान दर्जात आणले. अशा या आपल्या बाप माणसाची जयंती आपण उत्साहात साजरी करायलाच पाहिजे. मात्र आज आपण जशी डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी करतो तशी बाबासाहेबांना अपेक्षित होती काय? हा प्रश्न सतत मनात पडत आहे. बाबासाहेबांना आपण ज्ञानाचा महामेरू असे म्हणतो. असे का म्हणतो तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये ज्ञानाला आणि पुस्तकाला सर्वोच्च स्थान दिले आणि यामुळेच ते सुद्धा सर्वोच्च स्थानी पोहोचू शकले. ज्ञानाला माणसाच्या जीवनामध्ये खूप महत्त्व आहे. ज्ञानामुळेच माणूस काहीही करू शकतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच जाणले होते आणि म्हणूनच वेळोवेळी अर्ध पोटी राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि समाज परिवर्तनाचे हे कार्य ते करू शकले. मात्र आजची तरुण पिढी ही डॉक्टर बाबासाहेबांना पूर्णपणे समजू शकली नाही याची थोडीशी मनाला खंत वाटते. खरंच बाबासाहेब डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाई ला पाहून खुश होत असतील का? बाबासाहेबांना अशी तरुणाई अपेक्षित नव्हती तर ज्ञान घेऊन समाज परिवर्तनाची ही ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवून मागासलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम तरुणांनी करायला हवे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होते . आज आपण पाहतो की बाबासाहेबांच्या जयंतीसाठी लाखो रुपये खर्च करून गावात शहरात, मोठे मोठे डीजे आणले जातात आणि हर्ष उल्हासात बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून त्यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या जातात पण त्याच लाखो रुपयात कुणी ज्ञानार्जनासाठी अभ्यासिका किंवा वाचनालय काढण्याची संकल्पना कोणीही रुजवत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. गावातल्या खेड्यातल्या तरुणाला आजही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्या मुंबईसारख्या शहराचा आसरा घ्यावा लागतो मात्र त्यांच्यासाठी गावात एखादी अभ्यासिका काढण्याची गरज आहे. आणि बाबासाहेबांना सुद्धा तेच अपेक्षित होते. आपल्या समाजातील एखादा तरुण जर शिकून मोठा झाला तर तो समाजातल्या इतर तरुणांनाही प्रेरणादायी ठरतो आणि त्यांना सुद्धा समोर आणण्यासाठी प्रयत्न करतो हीसाखळी अशीच चालू राहून समाज उन्नती चे हे चक्र सुरू होते. मात्र केवळ अज्ञानापोटी आपण बाबासाहेबांना समजून न घेता आंधळेपणानेच त्यांची जयंती साजरी करतो असे म्हणावे लागेल. खरंच आज बाबासाहेबांची जयंती ही नाचून नाहीतर वाचून साजरी करण्याची गरज आहे. आपण वृत्तपत्रात नेहमीच वाचतो की बऱ्याच ठिकाणी. बाबासाहेबांना बारा ते चौदा तास अभ्यास करून मानवंदना दिली जाते. हेच बाबासाहेबांना अपेक्षित होते.शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र बाबासाहेबांनी उगाच समाजाला दिला नाही. शिक्षणाशिवाय माणसाची विचार करण्याची बुद्धी प्रलभ होत नाही. आणि बुद्धीच्या विकासासाठी वाचन हे खूप महत्त्वाचे आहे. वाचनामुळे माणसाला माणूस म्हणून जगण्याची आणि आपले अधिकार व हक्क समजून घेण्याचे ज्ञान येते. काय चूक आणि काय बरोबर याची कल्पना येते. वाचन म्हणजे मेंदूचा खुराक असतो आणि तो खुराक मेंदूला दिलाच पाहिजे. असे हे वाचनाचे महत्त्व आहे. मित्रहो मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली जयंती साजरी व्हायला हवी असे माझे मत आहे. तर यावर्षी खरच आपण मनापासून ठरवूया की विश्वरत्न बाबासाहेबांची जयंती यावर्षी नाचून नाही तर पुस्तक वाचून साजरी करू. आणि तीच खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना ठरेल. जय भीम
मोहन कळमकर,
मु पोस्ट ढाणकी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ
Mo.7385861446

0 टिप्पण्या