ढाणकी प्रतिनिधी-
शहरात कचरा व्यवस्थापन बऱ्याच दिवसानंतर पुन्हा सुरू झाले. नवीन कंत्राटदाराला कंत्राट तर मिळाले मात्र व्यवस्थापनाचे तीन तेरा वाजलेले शहरात दिसून येत आहे. अपुऱ्या वाहनांमुळे शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या कामात संथगती निर्माण झाली असून वाहने कमी आणि कचरा जास्त अशी स्थिती आहे.
संपूर्ण शहराचा कचरा फक्त तीन मालवाहू ऑटो आणि दोन ट्रॅक्टर वरच असून त्यातही कर्मचारी सुसाट वेगाने गाड्या पळवत असल्याने नागरिकांना आपला कचरा घेऊन त्या गाड्यांच्या मागे पळाव लागत असल्याने य नागरिकांनी संताप व्यक्त केला.
कचरा उचलण्यासाठी शहरात ठेकेदाराचे ट्रॅक्टर सुद्धा असून ते छोट्या छोट्या गल्ल्या मध्ये जात नसल्याने कचरा घेऊन नागरिकांना मोठ्या रस्त्यावर कामे सोडून उभे राहावे लागत आहे. तसेच काही गाडयांना हॉर्न सुद्धा नसल्याने गाडी कधी येऊन गेली हे सुद्धा कळायला मार्ग नाही.
शहरातील घनकचऱ्याचे कंत्राट अमरावती येथील मुकुंद सुरेश राजा नामक व्यक्तीने घेतले आहे. अद्यापही त्यांनी शहरात काम कसे चालू आहे हे पाहण्याची तसदी घेतली नाही. नगरपंचायत ची चार ऑटो ची मागणी असताना संबंधित ठेकेदारा ने फक्त तीनच ऑटो शहरात कचरा व्यवस्थापनाच्या कामात लावली. तर दोन ट्रॅक्टर हे कचरा गोळा करण्यासाठी आहेत. त्यामुळे शहरात इतरत्र मोठ्या प्रमाणात कचरा दिसत आहे. तरी संबंधित ठेकेदाराने ढाणकी शहराकडे लक्ष देऊन कचऱ्याच्या गाड्या वाढवण्याचे व कचरा व्यवस्थापनाचे काम व्यवस्थित करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

0 टिप्पण्या