नगरपंचायत निर्मिती पासून नागरिक घरकुलच्या प्रतीक्षेत. अनेक योजना रखडल्या.


ढानकी प्रतिनिधी -

ढाणकी गावाचे शहरांमध्ये रुपांतरण झाल्याने  ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाले. गावाचे शहर झाल्याने नागरिकांना सुद्धा आता सर्व शासकीय योजनेचा लाभ मिळेल अशी आशा होती. मात्र येथे उलटे झाले ग्रामपंचायत काळात ज्या काही शासकीय योजना लागू किंवा चालू होत्या त्या तर बंद झाल्या मात्र नगरपंचायत हद्दीतील कोणतीही शासकीय योजना अद्यापही चालू झाल्या नाही. त्यामुळे नागरिकांना या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. ग्रामपंचायत काळामध्ये घरकुलाच्या नियमित याद्या लागत असून सर्व नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळत होता . त्यामुळे आपले पण पक्के घर असावे  हे स्वप्न देखील पूर्ण होत होते.मात्र ढाणकी नगर पंचायत होऊन दोन वर्षाचा  कालावधी लोटल्यानंतरही त्यापैकी कोणतीही शासकीय योजना कार्यान्वित न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. घरकुल हा प्रत्येक नागरिकांचा जिव्हाळ्याचा असा विषय असताना या विषयाचे कोठे घोंगडे भिजत आहे हेच कळायला मार्ग नाही. त्यामुळे बर्‍याच नागरिकांनी आता कर्ज काढून घर बांधण्यास सुरुवात केली असून घरकुलाची आशाच सोडून दिली आहे. 

  ग्रामपंचायत अंतर्गत शासन अनेक योजना राबवित असते. मजुरांना हक्काच्या रोजगार हमी योजने अंतर्गत हाताला काम मिळून संसाराला दोन पैसे मिळत होते. नगरपंचायत आली परंतु शहरात कोणतीही कंपनी किंवा नगरपंचायत नागरिकाला काम देत नाही आहे त्यामुळे आता शेती वर सर्व मदार आहे. ज्यांच्याकडे शेती आहेत त्यांचे ठीक, मात्र भूमीहीन लोकांचे यामुळे मरण होत आहे. शेतीचे कामे आटोपले की नागरिकाला कामाच्या शोधत गाव सोडून जावे लागत आहे.मजुरांना तर ना काम मिळत आहे ना दाम यामुळे त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. गावातील रहिवाशीयांना उघड्यावर शौचास जाऊ नये याकरिता ग्रामपंचायत कडून घरोघरी संडास बांधून मिळत होते. रमाई आवास प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत गरीब गरजू रहिवाशीयाना घर बांधून मिळत होते गावातील शेतकरी बांधवाना वेगवेगळ्या योजने अंतर्गत विहरीचा लाभ मिळत होता. विहरीचा लाभ मिळाल्याने शेतकऱ्याची शेती ओलित होत होती, त्याच प्रमाणे शेतकऱ्याला शेतात गुरांना बांधण्या करीता गोठा मिळत होता.

नगरपंचायत झाल्यामुळे मजूर शेतकरी स्वतःच घराचे स्वप्न पाहणारे गोरगरीब सर्वांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसत आहे. नगरपंचायत निर्मिती मुळे फायदे कमी आणी नुकसान जास्त झाल्याचे नागरिक बोलत आहेत.ढाणकी नगरपंचायत ड वर्गात मोडत आहे त्यामुळे नगरपंचयत ने रोजगार हमी योजने चे कामे चालू करावी, शासना कडे शहरातील लेबर बजेट मांडून नागरिकांच्या हाताला काम मिळेल आणी शेतकऱ्याला सुद्धा त्याचा लाभ मिळेल अशी मागणी नागरिक करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या