हिमायतनगर शहरातील रस्त्यामध्ये पाणीच पाणी, घरातही पाणी शिरले, नगरपंचायतीचा हाच आहे का विकास ?

 


दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर प्रतिनिधी 


 मागील दोन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसाने हिमायतनगर तालुक्यात व शहर परिसरासह रान शिवारात पाणी साचले असून, हेच साचलेले पाणी शहरातील वॉर्ड क्रमांक १६ मधील नागरिकांच्या घरात शिरल्याने अनेकांना रात्र जागून काढावी लागली आहे. पावसाचे व नाल्याची घाण थेट घरात आल्याने अनेकांना रुग्णालय गाठण्याची वेळ आली असून, या प्रकारास नगरपंचायतीचे प्रशासन व कंत्राटदारांच्या नाकर्तेपणा आणि राजकीय नेत्यांची उदासीनता कारणीभूत असल्याचा संतापजनक आरोप या भागातील महिला - पुरुष नागरीक करत आहेत.  


हिमायतनगर नगरपंचायतीने मागील पंचवार्षिक काळात ५० ते ६० कोटी रुपयाच्या निधीरून शहर विकासाची कामे केली मात्र ती कुठं..? केली असा प्रश्न वॉर्ड क्रमांक १६ मध्ये संतप्तधार पावसाने उद्धवलेल्या परिस्थितीतून समोर येत आहे. हिमायतनगर शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर नागरिकांची समस्या मार्गी लागतील असे वाटले होते, मात्र ती अपेक्षा साफ खोटी ठरली असल्याचे दिसते आहे.  कोट्यावधीच्या निधीतून राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या टोलेजंग इमारती बांधुन स्वतःचे घरे भरली आहेत, त्यामुळे शहरातील अनेक वॉर्ड आजही खड्ड्यात गेल्याप्रमाणे पाहावयास मिळते आहेत. अनेक प्रभागात नाल्याचे झालेले निकृष्ट बांधकाम पावसाने  उघडे पडले आहे, काही ठिकाणी नाल्या खोदून ठेवल्या मात्र बांधल्या नसल्याने घराची पडझड झाली आहे.


वॉर्ड क्रमांक ४ नेहरूनगर मध्ये असलेल्या एका विहिरीचे अतिक्रमण नगरपंचायतीने काढले मात्र त्यातील निघालेला गाळ बाजूला नेऊन न टाकता राष्ट्रीय महामार्गावर उंच कट्ट्या प्रमाणे साठून ठेवला आहे. त्यामुळे रात्रीला झालेल्या ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसाने येथील रान शिवारात साचलेलं पाणी पुढे जाण्यासाठी मार्ग नसल्याने ते पाणी थेट वॉर्ड क्रमांक १६ मध्ये शिरले आहे. या पावसाने मुर्तुजा नगर भागातील गल्लीबोळात तळे साचले असून, नाल्याची दुर्गंधी आणि पावसाचे पाणी साचून राहिल्यान  नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. तसेच मुकी जनावरांना देखील साचलेल्या पाण्यात उभे रहावे लागले असून, यामुळे नागरिकांसह अबाल- वृद्ध साथीच्या आजाराचे बळी ठरत आहेत. आज सकाळ पासून अनेकांनी घरातील पाणी उपसून काढले असले तरी तळे साचलेले असल्याने पाणी घरात झिरपत असून खाली बसण्यासाठी जागा उरली नसल्याचे दिसून येत आहे.

     


   

      मागील काळात अनेक नागरिकांनी या वॉर्डातील  भागात रस्ते - नाल्याचे बांधकाम करून पावसाळ्यात होणाऱ्या अडचणी सोडविण्याची मागणी नगरपंचायत आणि राजकीय पुढाऱ्यांकडे केली होती. मात्र पुढाऱ्यांनी आपल्या जवळच्या लोकांच्याच पूर्ण केल्या. मात्र आवश्यक असलेल्या भागाकडे दुर्लक्ष केले आहे. मुर्तुजा नगर वस्ती ही शेतकरी, नोकरदार व मजुरदारांची आहे, त्यामुळे या गोरगरीब नागरिकांना टोलेजंग इमारती बांधता येत नाहीत. परंतु शहरातील नागरीक या नात्याने नागरी सुविधा मागण्याचा अधिकार आहे. परंतु त्यांच्या अधिकारावर नगरपंचायतीत बसलेल्यानी गदा आणुन स्वतःचे घरे भरल्याने शासनाच्या वस्ती सुधार योजनेचा बोजवारा उडाला आहे. पावसाळ्यात  उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेऊन तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर महोदयांनी गोरगरीबांच्या व्यथा जाणून घेऊन  आवश्यक असलेल्या ठिकाणी रस्ते नाल्या करून द्याव्यात आणि सुरक्षित आरोग्याची हमी द्यावी अशी रास्त अपेक्षा वॉर्ड क्रमांक १६ मधील नागरीकांची आहे.    

एवढेच नाहीतर १३ लाख रुपये महिन्याला घेऊन स्वच्छता करणाऱ्या कंत्राटदारांवर या भागात महिना महिना सफाई केली जात नाही. त्यामुळे वर्षभर नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो आहे. एवढेच नाहीतर या दुर्गंधीमुळे नाल्यात आळ्या निर्माण होत असून, या आळ्या घरात शिरत असल्यामुळे पावसाचे पाणी आणि घाण दोन्ही मिळून घरात येत असल्याने आमची मुलंबाळ आजारी पडत आहेत. हेच घाण पाणी बोअर आणि विहिरीमध्ये येत असल्याने दूषित पाणी पिऊन दिवसभर केलेली कमाई  सगळी दवाखान्यात घालावी लागत आहे. अगोदरच कोरोनाचा काळ आणि नगरपंचायतीचा सुलतानी कारभाराला  आम्ही वैतागलो असल्याचे सांगून आम्हाला स्वच्छतेसह नाल्या, रस्ते, वीज आणि पिण्याला स्वच्छ पाणी मिळावे अशी अपेक्षा या भागातील नागरिकांची आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या