ढाणकी प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील अग्रगण्य अश्या पतसंस्थांमध्ये गणल्या जाणाऱ्या उमरखेड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्था रनं १२१३ च्या वतिने नुकतेच सभासदांच्या गुणवंत पाल्याचा गुणगौरव व सेवानिवृत्त शिक्षकांचा भव्य सत्कार सोहळा पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. ह्या शानदार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उमरखेड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार नामदेवराव ससाणे हे होते.
भव्य दिव्य झालेल्या सदर कार्यक्रमास तालुक्यातील व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची खास उपस्थिती होती. विजयराव खडसे माजी आमदार, राजेन्द्रजी नजरधने माजी आमदार, तातूभाऊ देशमुख माजी बांधकाम सभापती जि.प. यवतमाळ, रामभाऊ देवसरकर सभापती बांधकाम जि.प. यवनमाळ, चितांगराव कदम जि.प. सदस्य, प्रकाशराव दुधेवार सभापती शिक्षण नपा उमरखेड, पंस सदस्य गजानन सोळंके,सर्व जिप व पं.स सदस्य,.पी.आर. खांडरे गटशिक्षणाधिकारी उमरखेड कार्यक्रमास प्रामुख्याने हजर होते.
सुमारे सव्वा कोटी रुपये नफ्यात असलेल्या सदर शिक्षक पतसंस्थेच्या वतिने दरवर्षी वैविध्यपूर्ण शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.सभासदांच्या हितासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या ह्या पतसंस्थेमार्फत त्यांच्यासह गुणवंत पाल्याचा गुणगौरव समारंभ काल आयोजित करण्यात आला होता. वर्ग चौथी,सातवी,दहावी व बारावी विशेष नैपुण्य प्राप्त पाल्यांना संस्थेच्या वतीने रोख रक्कम,आकर्षक गौरव चिन्ह ,प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.तसेच चालु शैक्षणिक वर्षात नियत वयोमानानुसार निवृत्त झालेल्या शिक्षक बांधवांची कृतज्ञता व्यक्त करत संस्थेच्या वतीने आकर्षक स्मृतिचिन्ह ,शालश्रीफळ देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रसंगी राष्ट्रीय आयसिटी पुरस्कार प्राप्त शे.शफी सरांचाही गौरव करण्यात आला.
१९८४ साली लावलेल्या उमरखेड शिक्षक पतसंस्थेच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे.स्वताच्या सुसज्ज वातानुकूलित इमारतीसह संस्थेचे प्रचंड भागभांडवल आहे.सभासदाला पस्तिस लाख रुपये कर्ज मंजूर करणारी ही संस्था परीसरात विश्वासास पात्र ठरली आहे.विद्यमान संचालक मंडळाच्या काळात झालेल्या व आगामी काळात नियोजीत असलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीची आढावापर माहिती संस्थेचे सचीव आनंद कुंबरवार ह्यांनी आपल्या प्रास्ताविकातुन दिली.
अगदी दिलखुलास व खुमासदार शैलीत झालेली पाहुण्यांची भाषणे हे कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य ठरले.गुणवंत विद्यार्थी व सत्कारमुर्ती निवृत्त शिक्षक ह्यांचा अभिनंदन व गौरव पाहुण्यांनी केला.सोबतच संस्थेचे पर्यायाने संचालक मंडळाच्या कामाचेही भरभरून कौतुक मान्यवरांनी केले.
सदर कार्यक्रमाचे संचलन डॉ.विनय चव्हाण,सुरेश वाघ, कृष्णा पाचकोरे व नागेश मिराशे यांनी केले तर आभार संस्थेचे अध्यक्ष प्रकाश महेशकर यांनी केले.भरगच्च उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व संचालक मंडळ सदस्य व शिक्षक बंधुभगिणींनी खूप परीश्रम घेतले.संस्थेच्या सदर स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0 टिप्पण्या