कोरोनाचे नियम पाळून सण-उत्सव साजरे करा - अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे


दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर प्रतिनिधी 

कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेऊन आगामी पोळा - गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरे करून प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी केले. ते हिमायतनगर येथील पोलीस ठाण्यात आयोजित शांतता कमेटीच्या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.


हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या वतीने दि.०२ गुरुवारी सायंकाळी ०४ वाजता आगामी पोळा, गौरी - गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

बैठकीला नायब तहसीलदार अनिल तामसकर, पोलीस निरीक्षक भगवान कांबळे, नगरपंचायतीचे ओएस डावरे, महावितरणचे कनिष्ठ अभियंता भडंगे, प्रतिष्ठित व्यापारी रफिक सेठ, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका पुष्पाताई मुधोळकर, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, परमेश्वर मंदिराचे संचालक अनिल मादसवार, आहद भाई, पोलीस उपनिरीक्षक परशुराम देवकते, दिलीप लोहरेकर पाटील, आशिष सकवान यांची प्रमुख उपस्थिती होती. 


बैठकीच्या सुरुवातीला प्रास्ताविक करताना पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी शासनाकडून सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोविड- १९ च्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या शासन नियमांचे वाचन करून पोळा- गणेशोत्सव साजरा करताना घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. शांततेत उत्सव साजरे करावेत असे सांगितले. 


यावेळी गणेशेत्सव मिरवणुकीतील येणाऱ्या अडचणी, समस्यांबाबत गजानन चायल, अनिल मादसवार, आशिष सकवान, आदींसह ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नाला अनुसरून बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी सांगितले कि, शासनाच्या नियमांचे पालन सर्वानाच करावे लागेल. गणेशाची स्थापना करण्याच्या ठिकाणापुरताच मंडप टाकण्याची परवानगी असून, देखावा करण्यासाठी परवानगी नाही. आरती करताना केवळ ५ जणांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेऊन करावी लागणार आहे. 

पोलीस प्रशासनाने ठरून दिलेल्या मार्गानेच पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली जावी. मिरवणूक रस्त्यात येणाऱ्या अडचणी बांधकाम साहित्य बाजूला करून रस्ता मोकळा करण्याच्या सूचना नगरपंचायतीने संबंधित नागरिकांना द्याव्यात. शहरातील पथदिवे सुरळीत करून भक्तांची अडचण दूर करावी. तसेच यंदा जास्त गर्दी करून मिरवणूक काढण्यास परवानगी नसल्याने नगरपंचायतीने गणेश मुर्त्याचे संकलन करून श्रीचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे. महावितरणने विजेची व्यवस्था सुरळीत ठेऊन गणेश भक्तांना अडचण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. गणेश मंडळांनी कोरोनाचा काळ असल्याने उत्सवादरम्यान रक्तदान शिबिरे, लसीकरणाचा संदेश देणारे किंवा लसीकरण शिबीर आयोजित करून शासनाच्या कार्यात सहभाग घ्यावा असेही त्यांनी सांगितले. 

शेवटी पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी मिरवणूक अडथळा दूर करण्यासाठी केलेल्या सूचनेनुसार संबंधितांना पत्रव्यवहार केला जाईल असे सांगून बैठकीला उपस्थित झालेल्या सर्वांचे आभार मानले. यावेळी संजय माने, जफर लाला, असद मौलाना, पंचफुलाबाई लोणे, विलास वानखेडे, प्रवीण कोमावार, विठ्ठल ठाकरे, पापा पार्डीकर, अन्वर खान, सय्यद मन्नान, तालुक्यातील पोलीस पाटील, शांतता कमिटीचे सदस्य, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, गणेश मंडळाचे व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी व पत्रकार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या