दाऊ गाडगेवाड- हिमायतनगर प्रतिनिधी
भोकर - किनवट- धनोडा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या ४ वर्षांपासून संत गतीने सुरु आहे. परिणामी पुल आणि रस्त्याच्या अर्धवट कामामुळे सर्वसामान्य नागरिक, प्रवाशी, वाहनधारक आणि शहरातील व्यापारी वर्गाना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. याबाबत असंख्य तक्रारी आल्याने महामार्गाचे वरिष्ठ अभियंत्यांना सोबत घेऊन रस्त्याचे काम पाहण्यासाठी खा. हेमंत पाटील यांनी हिमायतनगरला भेट दिली. या संदर्भात कंत्राटदाराला कडक सूचना करत रखडलेल्या रस्त्याचे व पुलाचे काम येणाऱ्या ३ महिन्यात पूर्ण करावे असे निर्देश दिल्याची माहिती हिंगोली लोकसभेचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
उपस्थित नागरिकांनी कंत्राटदारांच्या निष्क्रिय कामाबद्दल संताप व्यक्त केला तसेच खडे बोल सुनावले गेल्या ४ वर्षपासून या महामार्गावरील रस्ता तर सोडा साधे पुलाचे कामे देखील कंत्राटदाराला पुर्ण करता आले नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम दुसऱ्या कंत्राटदारास देण्यात यावे असे मतही अनेकांनी व्यक्त केले. या सर्वांचं म्हणणे ऐकून खा हेमंत पाटील यांनी कंत्राटदाराला कडक सूचना देत सांगितले कि, लवकरात लवकर या रस्त्याची अडचण दूर झाली पाहिजे. जनतेला याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या अश्या शब्दात कंत्राटदारांना सांगून आगामी ३ महिण्यात रस्त्याचे काम पूर्ण झाले पाहिजे अन्यथा गाठ माझ्याशी आहे अश्या शब्दात त्यांनी कंत्राटदारांना ताकीद दिली.
तसेच पत्रकार व नागरिकांशी संवाद साधताना ते म्हणले कि, मी नुकतेच केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आहे. हे काम करणाऱ्या कंत्राटदारांच्या काही तांत्रिक अडचणीमुळे कामाला गती मिळाली नाही. आता हे काम दुसऱ्या कंत्राटदाराला देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे लवकर या रस्त्याचे काम पुर्ण होईल हिमायतनगर शहरातून चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव आमदार जवळगावकरांनी माझ्याकडे मांडला आहे तो प्रस्ताव मी वरिष्ठाकडे पाठविला आहे. या कामामधे काही ठिकाणी वनविभागाच्या व इतर असलेल्या अडचणी लवकर दुर करून यावर काय तो निर्णय घेऊन शहरातील काम शक्य तेवढ्या लवकर पूर्ण व्हावे यासाठी मी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी त्यांच्यासोबत अजयराव देशमुख सरसमकर, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, प्रसिद्ध व्यापारी रफिक सेठ, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, परमेश्वर मंदिर कमिटीचे संचालक अनिल मादसवार, संटी कप्पलवाड पवणेकर, प्रकाश जाधव, इरफार खान पठाण, नाथा पाटील, आदींसह अनेक शिवसैनिक, पत्रकार, व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या