मंगेश गाडगे (८८६२०७३५६७)
आपण सर्व भारतीय इतक्यात एवढे व्यस्त झालो कि देश नावाचा प्रकार आम्ही पार विसरूनच गेलो. काही क्वचित लोकांना आठवतही असेल देश पेपर वाचतांना, आमचे सैनिक शहीद होताना, क्रिकेटप्रेमींना आठवतो भारत- पाकिस्तान चा सामना पाहताना. बहुतांशांना १५ आॅगस्ट व २६ जानेवारी लाच देशप्रेमाचा झटका येतो. आपले डी. पी., स्टेटस वर तिरंगा ठेऊन, खाऊन, पिऊन, झोपुन सार्वजनिक सुट्टिचा आनंद घेणे असा काहिसा स्वातंत्र्य दिन साजरा करणाराही वर्ग आपल्या देशात सर्वत्र मुबलक प्रमाणात आढळतो. शाळा संपल्यापासून कधीतरी झेंडावंदनाला उपस्थित राहिलेल्यांना नक्कीच सलाम केला पाहिजे. कारण आजची पिढी एवढी व्यस्त, व्यक्तिगत झाली की तिला स्वत:च्या पलीकडे काहीच दिसत नाही. मी, माझी नोकरी, माझं कुटुबं आणि माझी जबाबदारी. म्हणजे गाड़ी, माडी आणि आयुष्याच्या तडजोडी या पलीकडे कोणाची दृष्टीच पोहचत नाही. त्यामुळे देश नावाचा प्रदेश अस्तित्वात आहे आणि आपण त्याच प्रदेशात राहतो याचा आम्हाला विसर पडला आहे. त्यामुळे आपण जसे वागतो , जगतो त्याचा परिणाम सभोवतालच्या समाजावर होतो पर्यायाने देशावर होतो हे समजतच नाही. नागरिकांना भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद १९ द्वारे दिलेला स्वातंत्र्याचा हक्क माहीत असतो परंतु आपल्या स्वातंत्र्याच्या स्वैराचारामुळे दुसर्याच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही ना याची खबरदारी मात्र कोणी घेताना दिसत नाही. राज्यघटनेच्या अनुच्छेद ५१(क) मध्ये सांगितलेल्या मुलभुत कर्तव्यांची त्याला कदापि ओळखच नसते. सर्वजण नेहमी हक्क, अधिकारांवरच बोट ठेवताना दिसतात परंतु आपल्या कर्तव्याकडे मात्र सारेच कानाडोळा करतात. हेच भारतातील असंख्य समस्यांचे कारण आहे.
आज १५ आॅगस्ट २०२१ रोजी सर्व देश ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. परंतु फक्त झेंडावंदन करून, एक दोन गाणे ऐकुण न थांबता थोड़ा विचार देशातील वर्तमान घटना घडामोडींवर करायला हवा.
आज ज्या राजधानीत स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा होतोय त्याच शहरात २०१२ साली निर्भया प्रकरण घडले त्यामुळे संपुर्ण देश हळहळला. त्या आरोपींना शिक्षा २० मार्च २०२० रोजी ठोठावण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रातील कोपर्डी प्रकरण झाले बर्याच प्रतिक्षेनंतर आरोपींना शिक्षा झाली,त्यानंतर उत्तरप्रदेशातील हाथरस प्रकरण समोर आले त्याचा निकाल अजुन प्रलंबित आहे परंतु पिडितेच्या वकिल अॅड. सिमा कुशवाह यांच्यावर हल्ले केले जात आहेत त्यांना धमक्या येत आहेत. किती भयानक प्रकार आहे. अशातच राजधानी दिल्लीतील कँट येथे एका ९ वर्षीय मुलीवर स्मशानातील पुजारी व त्याच्या साथीदारांनी बलात्कार करून तिचे पार्थिव शरीर परस्पर जाळुन त्याची विल्हेवाट लावली आणि प्रकरण वाढु नये याची पुर्णपणे खबरदारी घेतली. या विषयांच्या खोलात न जाता निदान एवढा तरी विचार सर्वांनी जरूर करावा की जर या देशाच्या राजधानीत आमची माता, भगिनी सुरक्षित नसेल तिला स्वातंत्र्यपणे, निर्भयपणे मुक्तसंचार करता येत नसेल तर खेड्यापाड्यात,गावगाड्यात काय परिस्थिती असेल.यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे. घराबाहेर पडलेल्या स्त्रीला जर घरी सुरक्षित येण्याची हमी नसेल, तिच्या स्वातंत्र्यावर भितीची टांगती तलवार असेल तर तिने भारताचा स्वातंत्र्य दिन कोणत्या तोंडाने साजरा करावा? हा माझा प्रश्न आहे.
राजधानी दिल्ली येथे मागच्या २५० दिवसांपासुन सुरू असलेले शेतकरी आंदोलन घ्या. सरकार अजूनही त्यांच्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा काढु शकलं नाही. केंद्र सरकार ने पारीत केलेले तीन कृषी कायदे देशातील शेतकऱ्यांना मान्य नाहीत. त्यांच्या व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहेत असं त्यांचं मत आहे. कंत्राटी शेतीच्या धोरणाला त्यांचा विरोध आहे. तर त्यांना त्यांच्या मालाला हमीभाव हवा आहे. यावर ते अडुन आहेत. मागच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी गोंधळ घातला म्हणून त्यांच्या आंदोलनावर बर्याच जणांनी टिका केली. असंविधानिक कृत्याचा नेहमी निषेध केलाच पाहिजे. परंतु लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे त्यांना मुलभुत स्वातंत्र्य आहे आणि त्याचा सरकार सन्मान करणार नसेल तर लोकशाहीचा उत्सव म्हणजेच प्रजासत्ताक दिनी प्रजेची अवहेलना करणार्या सरकारचा निषेध व्यक्त करणे यात काही गैर वाटत नाही. आजच्या स्वातंत्र्य दिनी जर त्यांना व्यवसाय स्वातंत्र्याची हमी मिळणार नसेल, त्यांच्या आंदोलन स्वातंत्याचा सरकार कडुन सन्मान होणार नसेल तर हा स्वातंत्र्य दिनसुद्धा त्यांच्यावर थोपवल्यासारखाच होईल असे माझे मत आहे.
" गोरे लोग गए है
काले लोग आए है
जहर वही है यारों
बस प्याले बदल गए है "
असे दुर्दैवाने म्हटल्याशिवाय पर्याय नाही.
कोरोना महामारी ने सुद्धा काही बंधने सर्वांवर लादली आहेत. ती बंधने पाळून पाळून लोकांना खर्या स्वातंत्र्याची जणु भुलच पडलेली आहे. प्रवास बंद, कार्यालये बंद, सण उत्सव बंद, प्रार्थनास्थळे बंद असल्याने मागच्या दोन वर्षात स्वातंत्र्याचा आणि आपला काही सबंधच आला नाही. त्यामुळे या स्वातंत्र्य दिनी तरी कोरोनाच्या बंधनातुन मुक्ती मिळो. नागरिकांना ही मुलभुत हक्कांसोबत त्यांच्या मुलभुत कर्तव्याची जाणीव होवो. अशी आशा करुयात . हा स्वातंत्र्य दिन फक्त झेंडावंदन करून किंवा देशभक्तीची एक दोन गाणी ऐकुण नाही तर संविधानाला अभिप्रेत असलेला नागरिक बनण्याचा संकल्प करुयात आणि देशासाठी शहीद झालेल्या महान क्रांतिकारकांच्या स्वप्नातील, महामानवांच्या विचारातील आणि घटनाकारांच्या लेखनीतील सशक्त, समृद्ध, लोकशाहीवादी आणि खरा स्वातंत्र्य भारत घडवूया. अन्यथा "स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी पण स्वातंत्र्याची नाही खात्री" असे दुर्दैवाने म्हणण्याची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही.
जय हिंद. जय भारत स्वातंत्र्य दिन चिरायु होवो..!
लेखक बाळासाहेब ठाकरे लाॅ काॅलेज तळोजा, नवी मुंबई येथील कायद्याचे विद्यार्थी आहेत.


0 टिप्पण्या