दाऊ गाडगेवाड- हिमायतनगर प्रतिनिधी
नांदेड/भोकर/हिमायतनगर| कर्नाटक - तेलंगणा राज्यातून हिमायतनगरकडे येणारा गुटख्याने भरलेला दहा चाकी कंटेनर भोकर पोलिसांनी जप्त केला आहे. अंदाजे २७ लाखाच्या कंटेनरमध्ये ४२ ते ४० लाखाहून अधिकचा सुगंधी गुटखा, मसाला असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे. अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी आल्यानंतर यात किती लाखाचा माल होता आणि एकूण किती मुद्देमाल जप्त करण्यात आला हे स्पष्ठ होणार आहे. एकूणच भोकर पोलिसानी शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याचा कंटेनर पकडून केलेल्या कार्यवाही बाबत हिमायतनगर, भोकर तालुक्यातील व्यसनमुक्ती संघटनांच्या पदाधिकारीकडून भोकर पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहर हे गुटखा माफियांच केंद्रबिंदू बनलं आहे, हिमायतनगर शहरात तेलंगणा- कर्नाटक राज्याच्या सीमेवरून - नांदेडमार्गे कधी कंटेनर, कधी ट्रक तर कधी टेम्पच्या माध्यमातून गुटख्याची वाहतूक वाहनांची अदला-बदल करून केली जात आहे. हा सर्व प्रकार अन्न - औषध, पोलीस प्रशासनातील एलसीबीचे अधिकारी व त्यांच्या वरिष्ठाना तसेच ज्या भागातून हे वाहन येते त्या-त्या भागातील उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी याना सांगूनच हा गुटख्याचा गोरखधंदा वाहनातून चालविण्यात येत असते अशी माहिती पूर्वी गुटख्याच्या धंद्यात कार्यरत असलेल्या एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
अशाच प्रकारे आज सकाळी म्हणजे दि.२७ ऑगस्ट रोजी रामप्रहरी ४ वाजेच्या सुमारास गुटख्याने भरून कंटेनर क्रमांक THR 55U -7054 हा भोकर मार्गे - हिमायतनगरकडे जाण्याच्या तयारीत होता. याची गुप्त माहिती मिळल्यावरून भोकरचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल कांबळे यांनी गुटखा भरून वाहतूक करणारे हे कंटेनर जप्त केले. कंटेनरसह अंदाजे ७५ लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अन्न भेसळ अधिकारी यांच्या तपासणीनंतर याची खरी किंमत समजणार आहे. शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची नंबर दोनच्या धंद्यातून दर १५ दिवसांनी कोट्यवधींची उलाढाल होते. याचे केंद्रबिंदू असलेल्या हिमायतनगर शहरात गुटख्याचा माल आल्यानंतर येथील २ ते ३ व्यापारी छोट्या छोट्या वाहनाने हाच माल विदर्भातील अनेक मोठ्या शहराकडे पाठवतात. हा गुटखाचा गोरखधंदा मागील कोरोना काळातही राजरोपणे चालविण्यात आला असून, संचारबंदीत केवळ गोर गरीबांचे धंदे बंद होते, मात्र हे नंबर दोनचे धंदे राजरोसपणे सुरु होते हे नव्याने सांगायला नको.
मागील काही महिन्यांपूर्वी हिमायतनगर शहरातील सिरजनी रस्त्यावर असलेल्या एका राजकीय नेत्याच्या घराजवळ ४२ लाखाचा गुटख्यासह ट्रक एलसीबीने पकडला होता. यावेळी तडजोडीसाठी खूप आटापिटा झाला, मात्र गुटख्याचा ट्रक पकण्यात आल्याची माहिती मिळताच पत्रकारांचे पथक पोचल्याने अखेर त्या वाहनावर एलसीबीला कार्यवाही करावी लागली होती, त्यानंतर देखील शहरात गुटखा विक्रीचा गोरखधंदा राजरोसपणे सुरूच आहे. या बाबत अनेकदा वृत्त प्रकाशित करून स्थानिक पोलिसांनी या गुटख्याच्या अवैध धंद्यासह जुगार, मटका, सट्टा, बीसी, गल्लीबोळात होणारी आवैद्य दारू विक्रीच्या धंद्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केलं आहे. याचे उदाहरण म्हणजे आज हिमायतनगर शहरांकडे जाणाऱ्या गुटख्याचा कंटेनर भोकर पोलिसांनी पकडलेल्या घटनेवरून स्पष्ट होते आहे. हिमायतनगरात चालणाऱ्या अवैद्य धंद्यावर अंकुश आणण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन आणि पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्वतः जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच कोणत्याही राजकीय आश्रयाना थारा नं देता (भीक न घालता) मुसक्या आवळल्या शिवाय शहरातील हे अवैद्यधंदे बंद होणार नाहीत..? याचा आवर्जून उल्लेख करावा लागतो आहे.

0 टिप्पण्या