ढाणकी प्रतिनिधी -
कोरोनामुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन चालु आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प पडले असून यामुळे मात्र गरिबांचे मरण होत आहे. उदोगधंदे बंद पडल्याने हातचे काम गेले त्यामुळे एकवेळचे जेवणाचे सुद्धा वांदे होत आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन मध्ये तरी स्थानिक नेते मंडळींनी गरिबांसाठी राशन किट वाटप केल्याने तेवढाच त्यांना आधार झाला होता. मात्र "रोजचे मरे त्याला कोण रडे" या म्हणी प्रमाणे या वर्षी लॉकडाऊन मध्ये राशनकिट वाटपासाठी एकही स्थानिक नेता पुढे न आल्याने मजुरदार वर्गातून नाराजी दिसून येत आहे.
सध्या ढाणकी शहरात असे भरपूर कुटुंब आहेत की, ते लोकांच्या घरची धुनी भांडी, मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. काही दिव्यांग सुद्धा आहेत की ज्यांना काम होत नाही, त्यांच्या कुटुंबियांचे आज लॉकडाऊन मुळे हाल होत आहे. काही घराची स्थिती घरात नवरा दारुडा, लहान लेकरं आणि त्यात भर म्हणजे कोरोनामुळे लोकांनी धुणेभांडे वाली सुद्धा कामावरून कमी केल्याने त्या घरकाम मजुरांपुढे सुद्धा जगण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे.
शासनाने मोफत अन्न धान्य दिले मात्र त्यासाठी लागणारे इतर साहित्य म्हणजे चटणी, मीठ, तेल आणायला सुद्धा मजुरदार वर्गाजवळ पैसा नाही आहे. गेल्या वर्षी शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी राशन किट चे वाटप केले होते. मात्र या वर्षी त्यांना चक्क गरिबांचा विसर पडलेला दिसत आहे. वास्तविक पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कोरोनाने मोठी जीवित हानी केली असण्याने बऱ्याच कुटुंबाचे कर्ते धर्ते व्यक्ती कोरोनाला बळी पडले आहेत तेव्हा याच वर्षी गरिबांना मदतीची गरज असताना नेत्यांनी त्यांना वाऱ्यावर सोडले असल्याने उपाशी राहण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.
ढाणकी शहर हे दानशूरांचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात कोणत्याही सामाजिक कार्यासाठी मोठी देणगी मिळते. नुकतेच कोविड सेंटर साठी सुद्धा शहरातील नागरिकांनी मोठी मदत दिली होती. त्याच प्रमाणे आता स्थानिक नेते मंडळींनी एकत्र येऊन गरीब मजुरदार वर्गाचा हा प्रश्न सोडवणे गरजेचे असून गेल्या वर्षी सारखी राशन किट चे वाटप केल्यास तेवढाच त्यांना आधार होईल. अशी शहरात चर्चा आहे.

0 टिप्पण्या