अमृतेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. शिवनामाने दुमदुमून गेला हरदड्या चा परिसर.

 


ढाणकी प्रतिनिधी -हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र हरदडा येथील पुरातन अमृतेश्वर महादेव मंदिरात पवित्र श्रावण महिन्यानिमित्त भाविकांचा जनसागर उसळला आहे. श्रावण महिन्यात महादेवाची आराधना आणि पूजा-अर्चा करण्याला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने, दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसर शिवनामघोषाने दुमदुमून गेला आहे.

श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शिवाची विशेष पूजा करून 'शिवमूठ' वाहण्याची प्राचीन परंपरा आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर अमृतेश्वर मंदिरात किंवा घरातील शिवलिंगावर जल व पंचामृताचा अभिषेक केला जातो. महादेवाला प्रिय असलेले बेलपत्र, पांढरी फुले आणि भस्म अर्पण करून 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा जप करत भाविक श्रद्धेने शिवमूठ अर्पण करत आहेत. अध्यात्मात या शिवमुठीचे विशेष महत्त्व असून यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन भरभराट येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ज्या वर्षी श्रावणात पाचवा सोमवार येतो, त्या दिवशी सातू वाहण्याची परंपरा पाळली जाते.

अमृतेश्वर मंदिराचा परिसर नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे. मंदिराजवळ प्राचीन बारव आहे. पूर्वी बारवामधील पाणी पायऱ्यांनी उतरून घेण्याची सुविधा होती मात्र आता बरवाला झाकून ठेवलेले आहे. त्याचप्रमाणे परिसरात अति प्राचीन असे महाकाय वडाचे वृक्ष व इतर जातीचे हे वृक्ष आहेत . मंदिर प्रशासनाने लग्न समारंभासाठी खोल्यांची व्यवस्था केलेली असून दरवर्षी शेकडो लग्न तिथे लावले जातात. आणि लवकरच आता भव्य असे मंगल कार्यालय उभारण्यात येत आहे. मंदिराच्या बाजूनेच लहानसा ओढा वाहतो तो मंदिराच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकतो. 

अमृतेश्वराच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यात भाविकांची ब्रह्म मुहूर्ता पासूनच रीघ लागलेली असते. सकाळी काही भाविक विडुळ तसेच ढाणकी वरून पायी दर्शनासाठी येतात. या पायी येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून नारायण वानखेडे व वैभव पायगन हे दोघे स्वतः वैयक्तिक स्तरावर सकाळी त्यांच्यासाठी चहाची उत्तम व्यवस्था करत आहेत. त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे भक्तांकडून विशेष कौतुक होत आहे.

श्रीक्षेत्र हरदडा येथील अमृतेश्वर महादेव मंदिरात शंकरराव दत्तात्रेय मोरेश्वर हे मुख्य पुजारी म्हणून पूजा-अर्चा पाहत असून, नारायण वानखेडे व वैभव पायगन हे दोघे मंदिरात बाराही महिने सेवेकरी म्हणून सातत्याने आपली सेवा देत आहेत.

दर्शनासाठी आणि शिवमूठ वाहण्यासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. गर्दीचे योग्य व्यवस्थापन व्हावे आणि सर्व भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी मंदिर प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या