मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, आज मंगळवार, दिनांक १४ जुलै २०२६ रोजी सकाळीच पुसद तालुक्यातील लोणी येथील पाच मित्र दोन वेगवेगळ्या दुचाकींवरून सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी निघाले होते. दुपारी अंदाजे एक वाजताच्या सुमारास मुरली गावाजवळ, धबधब्यापासून काही अंतरावर असताना एका दुचाकीवरील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट रस्त्याशेजारील वनविभागाच्या लोखंडी सूचना फलकावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर रक्ताळलेल्या अवस्थेत फेकले गेले.
सोबतच्या दुसऱ्या दुचाकीवरील मित्रांनी कसलाही विलंब न लावता दोघांचा जीव वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. त्यांनी तात्काळ दोघांनाही जेवली येथील एका खाजगी रुग्णालयात नेले, मात्र त्यांची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी त्यांना तातडीने ढाणकी येथे हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, परंतु तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत जाधव यांनी तपासणी अंती सूरज मनवर याला मृत घोषित केले. तर गंभीर जखमी असलेला पृथ्वीराज याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, योग्य नियोजनाअभावी सहस्त्रकुंड परिसर आता अपघातांचे केंद्रबिंदू बनत चालला आहे. येथे भेट देणाऱ्या पर्यटकांनी वाहने चालवताना विशेष खबरदारी बाळगणे गरजेचे झाले आहे. तसेच प्रशासनाने देखील या अपघातांची मालिका लक्षात घेऊन तातडीने गतीरोधक किंवा योग्य त्या सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

0 टिप्पण्या