निसर्गाचा काही भरवसा नाही या उक्तीचा प्रत्यय सध्या ढाणकी आणि परिसरातील शेतकरी घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे आणि अवकाळी पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला हळद आणि टरबुजाचा घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांवर आभाळ फाटल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. ढाणकी परिसरात सध्या हळद काढणी, उकडणे आणि ती वाळत घालण्याची कामे जोमाने सुरू आहेत. मात्र, अचानक आलेल्या पावसाने आणि ढगाळ वातावरणामुळे वाळत घातलेली हळद भिजली आहे. यामुळे हळदीच्या दर्जावर परिणाम होणार असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. वर्षभर घेतलेली मेहनत डोळ्यादेखत मातीमोल होताना पाहून बळीराजा हताश झाला आहे. हळदीसोबतच या भागातील उन्हाळी टरबूज उत्पादकांनाही अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. पावसामुळे वेलींचे नुकसान झाले असून फळे सडण्याची भीती निर्माण झाली आहे. आधीच बाजारभावाची अनिश्चितता असताना आता निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पावसाचे सावट अजूनही कायम असल्याने शेतकऱ्यांच्या जिवाला घोर लागला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगावे की मरावे? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. प्रशासनाने आणि कृषी विभागाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन ढाणकी परिसरातील नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

0 टिप्पण्या