ढाणकी प्रतिनिधी- येथील जैन बांधवांच्या वतीने अहिंसा परमो धर्म चा संदेश देत भगवान महावीर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले असून, संपूर्ण ढाणकी शहर भगवान महावीरमय झाले होते. सकाळी स्थानिक स्थानकापासून भगवान महावीरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक शहरातील मुख्य बाजारपेठ आणि प्रमुख मार्गावरून मार्गस्थ झाली. यावेळी भगवान महावीर की जय आणि अहिंसा परमो धर्म अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. शहरातील ठिकठिकाणी आणि मुख्य चौकांमध्ये या मिरवणुकीचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भगवान महावीरांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. भगवान महावीर हे जैन धर्मातील २४ वे तीर्थंकर होते त्यांनी जगाला सत्य, अहिंसा, संयम आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला. आजच्या तणावपूर्ण युगात त्यांचे विचार केवळ धार्मिक नसून वैज्ञानिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे आणि कालसुसंगत आहेत, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या सोहळ्याचे नियोजन आणि यशस्वीतेसाठी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती व कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या