इराण युद्धाच्या अफवेने ढाणकीत पेट्रोलसाठी हाहाकार, पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा! प्रशासनाचे नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन.


इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भविष्यात पेट्रोलचा मोठा तुटवडा निर्माण होणार असल्याची एक भीतीदायक अफवा सध्या वाऱ्यासारखी पसरत आहे. या अफवेचा परिणाम आज 4 मार्च रोजी ढाणकी परिसरात पाहायला मिळाला. सकाळपासूनच पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची अभूतपूर्व गर्दी उसळली असून, नागरिक अक्षरशः पेट्रोल मिळवण्यासाठी जीवघेणी धडपड करत होते. भर उन्हात तासनतास रांगेत उभे राहून नागरिक इंधन साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते. ग्रामीण भागात या अफवेमुळे घबराटीचे वातावरण असून, पेट्रोलसोबत डिझेलचीही मोठी विक्री होताना दिसत आहे. या वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अफवांना पूर्णविराम देण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. उमरखेडचे तहसीलदार राजू सुरडकर यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. 

शासनाकडून पेट्रोल पुरवठा बंद करण्याबाबत कोणतेही आदेश आलेले नाहीत. पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. महत्त्वाचे म्हणजे, सध्या कडाक्याचे ऊन आहे. अशा वातावरणात ज्वलनशील पेट्रोल घरात साठवणे म्हणजे मोठ्या आगीला आमंत्रण देणे आहे. स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका.

राजू सुरडकर (तहसीलदार/तालुका दंडाधिकारी, उमरखेड)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या