परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे जिल्ह्यात प्रचंड नुकसान. राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई व पीकविमा मिळवून द्यावा ! भागवत देवसरकर यांची राज्य सरकारकडे मागणी.

 


दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर प्रतिनिधी 

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावातील पीक पाहणी केली असता,या बाधित क्षेत्रात पावसामुळे सोयाबीनचे पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी, विमा कंपनीने प्रशासनाचा पंचनामा ग्राह्य धरुन शेतकऱ्यांना सरसगट पीक विमा द्यावा अशी आग्रही मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.

सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे अनेक दिवसांपासून सोयाबीन पिकात पाणी साचलेले असल्याने शेंगा काळ्या होणे, बुरशी लागणे, कोंब फुटणे याला सुरुवात झालेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात काहीच लागणार नाही, उलट काढणीचा खर्च माथी पडणार आहे,सणासुदीच्या तोंडावर हा आर्थिक फटका अनेकांसाठी असह्य ठरणार आहे, सरकारने आपली आजवरची निष्ठूरता बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अनुदानच नाही तर पीक विम्याची सरसकट नुकसान भरपाई देखील तातडीने जाहीर करावी,गतवर्षीच्या पीक विम्याचा अजूनही पत्ता नाही पण किमान दिवाळीच्या आधी तरी ती रक्कम मिळायलाच हवी अशी भावना गावोगावी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या दुर्दैवी नैसर्गिक आपत्तीमुळे उदभवलेल्या परिस्थितीने खचून जाऊ नये अस शेतकऱ्यांना आवाहन करत,एकत्रितपणे, आक्रमकपणे आपल्या हक्काचे अनुदान व नुकसान भरपाई सरकारकडून मिळवून घ्यावीच लागेल असा इशाराही भागवत देवसरकर यांनी दिला आहे.

ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. अशा शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करताना अडचण येत असेल तर कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्याकडे ऑफलाईन अर्ज करावा व पोहोच घ्यावी,जिल्हा प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसानीचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवून लवकरात लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून घ्यावी अशी आग्रही मागणी देखील शेवटी भागवत देवसरकर यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या