ढाणकी प्रतिनिधी -
दिवसभर काबाड कष्ट करून रात्री निवांत झोपलेल्या कृष्णापूर वासियांना काल रात्री झालेल्या प्रचंड पावसाने हवालदिक केले. गेल्या दोन साप्ताह पासून दडी मारून बसलेल्या पावसाची बळीराजा मोठ्या आतुरतेने वाट पाहत होता. पिकांनी सुद्धा माना टाकल्या होत्या अश्या स्थितीत पावसाची प्रचंड गरज होती. पावसाठी देवाला साकडे घातले जात होते. देवाला सुद्धा कीव आली आणि मागील दोन दिवसापासून पाऊस सुरु झाला. शेतकरी वर्ग आनंदवला. शेतकऱ्यांचे हे सुख देवाला सुद्धा पाहवले नाही असे म्हणा. आणि काल रात्री कृष्णापूर परिसरात प्रचंड ढगफुटी झाली. रात्री 1 ते दीड च्या सुमारास गावा मध्ये पाणी साचले . नाल्याचे पाणी गावात शिरल्याने गावात एकच तारांबळ उडाली. गावात ही स्थिती तर शेतातील तर पूर्णपणे पिके भुईसपाट झाली. आधीच दुबार पेरणी आणि त्यात हे संकट या मुळे कृष्णापूर येथील शेतकरी पूर्णपणे पिचून गेला असून तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावल्याने बळीराजा हतबल झाला आहे. कोरोना मुळे ग्रामीण भागातील संपूर्ण अर्थव्यवस्था विस्कटली असून आता या ढगफुटी मुळे होते नव्हते ते सारे गेले. उभे पीक आडवे झाल्याने मुलीचे लग्न, शिक्षण, कपडालत्ता, सण, हे कस सार भागवायचे हा मोठा प्रश्न कृष्णापूर वासीयांपुढे आ वासून उभा आहे. आता या असमानी संकटावर शासनाने त्वरित पंचनामे करून काही तरी मदत करावी जेणे करून थोड्या प्रमाणात का होईना आधार होईल अशी मागणी कृष्णापूर येथील नागरिक करत आहेत. तरी शासनाने लवकरात लवकर मदत करण्याची मागणी जोर धरत आहे.
0 टिप्पण्या