स्वतंत्र मिळून 74 वर्षं झाली पण गावाला रस्ता नाही. बंदी भागातील गावांची करूण कहानी. स्थानिक नागरिक उपोषणाच्या तयारीत.



 बिटरगाव प्रतिनिधी -कमलाकर दुलेवाड 


 विदर्भ आणि मराठवाड्यात चे शेवटचे टोक असलेल्या पैनगंगा अभयारण्यतील भागाला बंदी भाग म्हणून ओळखले जाते. यवतमाळ जिल्ह्यातील शेवटचा तालुका म्हणून उमरखेड तालुका ओळखला जातो. या बंदी भागात 40 पेक्षा जास्त खेडेगाव आहेत. यांना जवळचे  शहर म्हणजे ढाणकी किंवा तालुक्याचे ठिकाण म्हणजे उमरखेड. बंदी भागातील दराटी, जवराळा, मोरचंडी, जेवली या गावातील नागरिकांना दवाखाना असो किंवा इतर कोणतेही काम त्यांना ढाणकी किंवा उमरखेड येण्यासाठी 60 ते 65 किमीचा प्रवास करावा लागतो. मात्र हा प्रवास सुखाचा नाही. ढाणकी पासून बिटरगाव जेवली रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे झाली पण या गावांना चांगला रस्ता मिळालं नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. वाहनधारकांना आपले वाहन चालवताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते, खड्डे चुकवावी लागतात एवढे करूनही आपण सुरक्षित प्रवास होईल  याची कुठलीही शाश्वती नाही. रस्त्याची  पूर्णपणे चाळणी झाली असून त्यामुळे अपघातांची संख्या सुद्धा वाढली आहे. या रस्त्यावर या वर्षी चार अपघात झाले  असून चारही व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. बंदी भागातील नागरिकांना या रस्त्यामुळे दवाखाना सुद्धा अवघड झाला असून बऱ्याच वेळा गर्भवती महिलांना दवाखान्यात नेण्या  आधीच या खराब रस्त्यांमुळे रस्त्यातच प्रसूत होण्याची वेळ आली आहे तरीही सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर बाबीकडे हेतुपुरस्पर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. काही प्रमाणात काम झाले तरीही संबंधित कंत्राटदाराने कशाप्रकारे काम केली हे बांधकाम विभाग पाहत नाही त्यामुळे कंत्राटदार थातूरमातूर काम करून आपले बिल काढून घेतात आणि रस्ते पाण्यात वाहून जातात अशी स्थिती बंदी भागातली आहे. रस्ते हे देशाच्या प्रगतीचा महत्त्वाचा भाग असल्याचे आपण म्हणतो पण ग्रामीण भागातील या रस्त्याचा वाली कोण?  हा मोठा प्रश्न आहे. निवडणूक असली की उमेदवार या भागात येतात आणि मोठी मोठी आश्वासने देऊन निघून जातात. मात्र समस्या आहे तशीच राहते. 

 आज भारत देश प्रगतीचे शिखर गाठत असताना ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा खरच लाजिरवाणी आहे. या स्थितीला जबाबदार कोण कंत्राटदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी की लोकप्रतिनिधी याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे. आता या सर्व स्थितीला नागरिक कंटाळले असून रस्ता केव्हा आम्हाला मिळणार? असा सवाल करत आहे. आम्ही फक्त निवडणुकी पुरतेच का? आम्हाला सुविधा कधीच मिळणार नाही का? असा प्रश्न स्थानिक नागरिक  करत आहेत. सदर रस्ता चांगला झाला नाही तर आम्ही उपोषणाला बसू असे सुद्धा नागरिकां चे म्हणणे आहे. तेव्हा संबंधित विभागाने या गंभीर बाबी ला मनावर घेऊन रस्ता ताबडतोब चांगला  करून द्यावा अशी मागणी बंदी भागातील नागरिक करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या