त्या अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेमुळे शहरातील शिक्षक कॉलनी मधील नागरिक अजूनही तहानलेलेच.


ढाणकी प्रतिनिधी-

ढाणकी नगरपंचायत झाल्यापासून एकही अधिकारी नगरपंचायत ला पूर्ण वेळ मिळालेला नाही. मुख्याधिकारी पासून सर्व अधिकारी प्रभारावर असल्याने ढाणकी शहराकडे त्यांचे सपशेल दुर्लक्ष होत आहे. शहरातील चालु असलेेल्या कामावर  वचक ठेवण्यासाठी अधिकारीच नसल्याने कामाची स्थिती ही जैसे थे च आहे.

शहरातील शिक्षक कॉलनी इथे आजपर्यंत ही नळ योजनेचे पाणी पोहोचले नाही. त्यामुळे अनेक वेळा अर्ज विनंती केल्यानंतर शिक्षक कॉलनी येथे नळ योजना पोहोचण्यासाठी व पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ता खोदून ठेवण्यात आला. या कामालाही आज पंधरा दिवसाच्या वर कालावधी झाला असून पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुख सोळंके मॅडम यांनी शहराकडे पाठ फिरवल्याने हे काम थंड बस्त्यात पडले आहे. यावर नगरसेवक सुद्धा लक्ष देत नसल्याने  नागरिकांनी  कुणाकडे पाहायचे हा मोठा प्रश्न यावेळी निर्माण झाला. 

वारंवार यासंदर्भात सोळंके मॅडम यांना फोन केला असता एकदाही त्यांनी फोन उचलण्याची तसदी घेतली नाही. नगरपंचायत ला सुद्धा  त्या येत नसल्याने दाद तरी कुणाकडे मागायची हा नागरिकांना प्रश्न पडला आहे. 

तरी अशा निष्क्रिय अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करून नळ योजना ताबडतोब शिक्षक कॉलनी पर्यंत पोहोचवण्याची मागणी नागरिक करत आहेत.

एखाद्या वेळेस पाणी पुरवठा विभागाच्या प्रमुख सोळंके मॅडम या कार्यालयात उपस्थित राहिल्यास नागरिक त्यांच्याकडे विविध समस्या घेऊन येत असतात अशावेळी त्या नागरिकांचे समाधान न करता त्यांना उद्धटपणे बोलत असल्याची चर्चा सुद्धा नागरिकात आहे.

"ढाणकी नगरपंचायत झाल्यापासून  शहरात विकासाचा  फक्त देखावा केला जात आहे. एखाद दुसरी काम चालू झाले तर त्याला भ्रष्टाचाराची कीड लागते. आजपर्यंत ही शिक्षक कॉलनी  येथे नळ योजनेची पाणी पोहोचले  ही फार मोठी शोकांतिका असून  या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुख अंजली सोळंके यांच्यावर कारवाई व्हायला हवी."

संजय कुंबरवार

शिवसेना तालुका प्रमुख (ठाकरे गट)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या