ढाणकी प्रतिनिधी
दिवाळी म्हटलं की आपल्यासमोर येते, रोषणाई फटाके, मिठाई, नवीन कपडे, आणि आणि कुटुंबासोबत केलेली मजा. दिवाळी हा सण भारतीयांसाठी सगळ्यात मोठा सण असून प्रत्येक जण आपापल्या परीने तो साजरा करतो. मात्र समाजात असेही काही लोक आहेत की, त्यांची दोन वेळ जेवणाची सुद्धा भ्रांत असते. हातावर आणून पानावर खायची अशी स्थिती असल्याने दिवाळी सन म्हणजे काय हा सुद्धा त्यांना मोठा प्रश्न पडलेला असतो.
प्रत्येक जण आपापल्या कुटुंबासोबत हर्ष आनंदात सण साजरा करण्यात गुंतलेला असतो. मात्र या लोकांची दिवाळी कशी साजरी होत असेल? प्रश्न सहसा कोणालाही पडत नाही. मात्र याला सुद्धा काही लोक अपवाद असतात. याचे जिवंत उदाहरण द्यायचे झाल्यास ढाणकी येथील कपडा व्यवसायिक गजानन मिटकरे यांचे द्यावे लागेल. मनाने निर्मळ असे हे व्यक्तिमत्त्व, कोणतेही सामाजिक कार्य असो त्यात सदैव पुढे असते. गजानन मिटकरे यांनी यावर्षी आपली दिवाळी काहीतरी वेगळ्या पद्धतीने करण्याचे ठरवले आणि त्यावर लागलीच अंमल केला. ढाणकी शहरातील निराधार आणि गरीब लोकांचा त्यांनी शोध घेतला. त्यांना आपल्या दुकानात बोलावले. त्यांचा सन्मान केला, त्यांना दिवाळीनिमित्त कपडे आणि मिठाई दिली. आणि भविष्यात काही अडचण आल्यास नक्की कळवा आधार दिला. त्यांची ही कृती समाजातील आंधळ्या लोकांना झणझणीत अंजन घालणारी असून अशा कार्यासाठी समाजातील इतर लोकांनी सुद्धा समोर येण्याची गरज आहे. गजानन मिटकरे यांच्या या कृतीचे ढाणकी मध्ये कौतुक होत आहे
0 टिप्पण्या