अकोली प्रतिनिधि
(महिला बचतगटाला एमव्हीएसटीएफ निधीतून अनुदानित चाळणी देऊन लघुउद्योग स्थापना)y
महाराष्ट्र शासनाकडुन महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (एमव्हीएसटीएफ) अंतर्गत राज्यातील 1000 गावे, आदर्श गाव म्हणून विकसित करण्यात येत आहे. या आदर्श गावांमध्ये सामाजिक व आर्थिक परिवर्तनासाठी गरीब कुटुंबातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण आखले आहे. त्याचाच एक भाग म्हणून उमरखेड तालुक्यातील आकोली गावामध्ये 26 महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली. केवळ बचत करणे व कर्ज वाटणे, एवढयावर मर्यादित न राहता संघटित होऊन महिलांनी स्वतःचा शेतीपूरक लघुउद्योग उभारण्याकरिता महिलांना प्रशिक्षण आणि अनुदान देऊन मार्गदर्शन केले जाते.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य व वाजवी दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतमालाची प्रतवारी होणे आवश्यक असते. शेतमालाच्या प्रतवारीसाठी आकोली गावातील शेतकऱ्यांकडे धान्य चाळणी यंत्र स्पायरल सेपरेटर उपलब्ध नसल्याकारणाने शेतकऱ्यांना ढाणकी येथून भाडेतत्त्वावर खाजगी वाहनांमध्ये चाळणी यंत्र गावांमध्ये आणून ते काम झाल्यानंतर परत करावे लागत असे. यामध्ये शेतकऱ्यांचा यंत्र नेण्या-आणण्यासाठी वेळ तसेच वाहन भाडे सुद्धा खर्च होत असे, तसेच सर्वच शेतकरी हा अतिरिक्त खर्च परवडत नसल्याकारणाने आपला शेतमाल प्रतवारी न करताच विक्री करत असत त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला कमी भाव मिळत असे. ही बाब ग्रामपरिवर्तक शिवप्रसाद येळकर यांनी लक्षात घेऊन आकोली गावामध्येच शेतमाल प्रतवारी केंद्र स्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत ग्राम कोष निधीमधून 50 टक्के अनुदानित रक्कम आणि बचत गटाच्या महिलांची 50 टक्के रक्कम एकत्र करून स्पायरल सेपरेटर चाळणी खरेदी करण्यासंदर्भात ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. याप्रमाणे ग्रामपंचायत मार्फत आकोली तांड्यातील एक आणि आकोली गावासाठी एक अशा दोन गटासाठी चाळण्या खरेदी करून ग्रामसभेमध्ये ईश्वर चिठ्ठी काढून ज्या बचत गटाचे नाव ईश्वर चिठ्ठीत आहे, त्यांना सदर चाळण्या देऊन उद्योग स्थापन करण्याचे ठरले. ईश्वर चिठ्ठीमध्ये जय संतोषीमा बचत गट आणि वच्छलाबाई वसंतराव नाईक बचत गटाला चाळण्यांचा लाभ लागू झाला त्याप्रमाणे चाळण्या ग्रामपंचायत आकोली मार्फत खरेदी करण्यात आल्या.
चाळणी वाटपाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तकांनी शेतमाल प्रतवारीचे महत्व प्रोजेक्टरच्या माध्यमातून व्हिडिओ दाखवून उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितले. उपस्थित बचत गटाच्या महिला आणि ग्रामपंचायत मध्ये चाळणीचे भाडे दर संदर्भात करार झाला त्याप्रमाणे एका दिवसासाठी शंभर रुपये भाडे ठरवण्यात आले.
स्पायरल सेपरेटरचा उपयोग सोयाबीन, तूर, हरभरा, वाटाणा, मूग, उडीद, गहू, ज्वारी यामधील किडलेले, हलक्या दर्जाचे धान्य, धूळ, काडीकचरा वेगळे करून शेतमालाची प्रत सुधारण्यासाठी होणार आहे, यासाठी कुठल्याही विजेची आवश्यकता भासत नाही. शेतकऱ्यांनी स्पायरल सेपरेटर मधून धान्य साफ केल्यामुळे 90 टक्के पेक्षा जास्त प्रमाणात धान्यातील इतर घटक बाहेर निघाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला 10 ते 15 टक्के वाढीव भाव भेटणार आहे. त्याचप्रमाणे स्पायरल सेपरेटर महिला बचत गटामार्फत भाडेतत्त्वावर देण्यात येत असल्याकारणाने बचत गटाच्या महिलांना शाश्वत उत्पन्न मिळून त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहेत.
चाळण्यांचे वाटप आणि उद्घाटन उमरखेड पंचायत समितीचे सभापती प्रवीण पाटील मिराशे यांच्या हस्ते करण्यात आले. सभापतींनी उपस्थित बचत गटांच्या महिलांना उद्योग व्यवस्थित रित्या चालवण्या संदर्भात मार्गदर्शन करून, उपस्थित शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान केले, तसेच महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत सुरु असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांंची प्रशंसा सभापतींनी केली.
या प्रसंगी उपसरपंच बाबुराव वाघमारे, पोलीस पाटील पंडित धात्रक, ग्रामसेवक एफ एल शेख, ऍक्सिस बँक फाऊंडेशन अंतर्गत दिलासा संस्थेचे समन्वयक अतुल मादावार, सुभाष राठोड, साहेबराव राठोड, आनंदराव धात्रक, किसन आडे, भारत बोईनवाड, प्रशांत शेळके, सुरेश राठोड, बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

0 टिप्पण्या