आज मोहनदास करमचंद गांधी नामक माणसाचा वाढदिवस आहे ज्याला राष्ट्रपिता, बापू, महात्मा किंवा गांधीजी म्हणूनही ओळखलं जातं. सभ्य सुसंस्कारी नवभारतात त्यांना टकल्या, म्हातारा, देशद्रोही, मुस्लिमप्रेमी अशाही पदव्या मिळाल्या आहेत. गांधी आज असते तरीही त्यांना त्याचं काही वाटलं नसतं. त्या माणसानं कधी इतरांना काय वाटतं याची फारशी पर्वा केली नाही. त्याला जे वाटलं त्याच्यावर तो कायम ठाम राहिला. पण जेव्हा ते चुकीचं आहे असं त्याला वाटलं तेव्हा त्यानं प्रामाणिकपणे आपल्या चुकाही कबूल केल्या. त्या सुधारण्याचा प्रयत्नही केला. असं वागणं असं करणं हे वाटतं तितकं सोपं नाही. हवं तर तसा प्रयोग करून बघा. गांधी शेवटी प्रयोगावर विसंबून असलेला माणूस होता. त्यानं सत्याचे प्रयोग केले, अहिंसेचे प्रयोग केले, ब्रह्मचर्याचे प्रयोग केले, सत्याग्रहाचे प्रयोग केले, सर्वधर्मसमभावाचे प्रयोग केले. कधी त्याचे अंदाज बरोबर ठरले, कधी चुकले. कधी त्याचे निष्कर्ष बरोबर होते, कधी नाही. पण चुकतमाकत तो शिकत राहिला. थांबला नाही. त्याची जबर किंमतही त्यानं वेळोवेळी मोजली. त्याच्या जीवंतपणीच त्याला लोकांनी हट्टी म्हातारा, राजकारणातला संत, संतांमधला राजकारणी, म्हटलं. शेवटी तर त्याला आपला जीवही गमवावा लागला. गांधी असणं सोपं नाही. नव्हतं. आपण साऱ्यांनीच कधी तरी चोरी केली आहे. दारू सिगारेट विडी तंबाखू खाल्ला आहे. वैषयिकपणाची अति केली आहे. बायकोवर हात उचलला आहे, शिव्या घातल्या आहेत. कामाच्या व्यापात मुलांकडे दूर्लक्ष केलं आहे. लोकांचा विरोध पत्करून आपला हट्ट चालवला आहे. अनेक वेळा अपमान सोसला आहे. हेटाळणी सहन केली आहे. पण म्हणून काही आपण गांधी होत नाही. मग मोहनदास करमचंद गांधी हा असं सर्व केलेला माणूस महात्मा गांधी कसा झाला याचा प्रश्न पडतो. निदान मला तरी पडतो. तुम्हाला पडतो की नाही ते मला माहिती नाही. मी विचार करतो की माझ्या आजूबाजूला अर्धनग्न स्त्रीपुरुष लहान मुलं दिसत असतांनाही मी कपडे घालतो, त्यांच्याकडे दूर्लक्ष करून. गांधींनं कपडे घालायचं नाकारलं. गांधीच्या वेळीही अर्धनग्न माणसं होती. आताही आहेत. फक्त गांधी नाही. इतर कोणीही नाही. तुम्हाला माहिती असेल तर जरुर सांगा. प्रत्येक बदलाची सुरूवात स्वतःपासून केली पाहिजे असं गांधी म्हणायचा. हसत हसत म्हणायचा हसत हसत करायचा तो बदल. त्यानं आजच्या राजकीय नेत्यांच्या भाषेत सांगायचं तर ते सारे बदल करून दाखवले. त्याला आणखीही बरंच काही बदलायचं होतं पण त्याची वेळ संपत चालली होती. आणि सव्वाशे वर्ष जगण्याची इच्छा धरलेल्या त्याच्या म्हाताऱ्या पण तरुण मनाच्या शरीराला त्याआधीच संपवण्यात आलं. गांधीला स्वतःसाठी बदल नको होते. इतरांना बदलण्यासाठी त्यानं आधी स्वतःला बदललं. आम्ही तर स्वतःसाठीही बदलायला तयार नसतो. गोड खाऊन शुगर वाढत जाते पण आपण गोड खाणं बंद करत नाही. आजारी पडूनही व्यायाम करत नाही. खाण्यापिण्याच्या सवयी बदलत नाही. इतरांसाठी आम्ही काय बदलणार मग? आम्ही फक्त एकच गोष्ट करू शकतो. जी आम्ही तेव्हाही केली होती आणि आजही करत आहोत. ती म्हणजे गांधीला शिव्या घालण्याचं, त्याचा अपमान करण्याचं, त्याची निंदानालस्ती करण्याचं काम. त्याच्या कामाचं श्रेय हिरावून घेण्याचं काम. असं करण्याचा आपल्याला काय अधिकार आहे, आपली काय पात्रता आहे याचा कोणताही विचार अशावेळी आपल्या मनातही येत नसतो. पण तरीही आपण हा अधिकार गाजवत असतो. आपण गांधीचा वापर करणंही शिकलो आहोत. आपल्या सोयीनं आपण हा गांधी वापरून घेतो. गांधी आज असते तर त्यांना याचं काही वाटलं असतं का? कल्पना नाही. त्यांनी फार तर म्हटलं असतं तुम्हाला जे करायचं आहे म्हणायचं आहे ते तुम्ही करा. मला जे करायचं आहे म्हणायचं आहे ते मी करणार. कर के देखो हा त्याचाच मंत्र. गांधीला आपली गरज नाही. आपल्यालाच त्याची गरज आहे. अर्थात ती आहे हे कळायलाही किंचीत का होईना पण गांधी आपल्यांत असणं भाग आहे. केवळ मनुष्य प्राण्याचं शरीर लाभलं म्हणून आपण माणूस होत नसतो. माणूसपण मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. जेव्हा आपण माणूसकीची वाट चालू लागतो तेव्हा कधीतरी त्या वाटेवर पिंपळाखालचा ध्यानस्थ तथागत भेटतो, कधी गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून देणारा आंबेडकर भेटतो आणि मग माणूस असण्याचं मर्म आपल्या जगण्यातून उलगडून दाखवणारा गांधीही भेटतो. गांधीचा आज वाढदिवस. पण त्यानिमित्ताने मी गांधीला नाही तर तुम्हाला मला शुभेच्छा देणार आहे की गांधी आपल्या मनात वाढत जावो.
प्रतिक पुरी,
ख्यातनाम लेखक आणि कवी
pratikpuri22@gmail.com

0 टिप्पण्या